डॉ. रामचंद्र देखणे यांनी लोककलेचा गोंधळ घालत मूल्यांचा जोगवा मागितला : प्रा. मिलिंद जोशी

‌‘बहुरूपी भारूड' कार्यक्रमाचा पुन:प्रारंभ : डॉ. रामचंद्र देखणे लिखित ‌‘लोककलेतील गण' पुस्तकाचे प्रकाशन

 

पुणे , ((प्रबोधन न्यूज )  -  लोककलेतला गोंधळ फिका पडावा असा गोंधळ सध्या राजकारणी मंडळी घालत असून लोककलेतील गोंधळ समाजमानस प्रदूषित करीत आहे. मात्र डॉ. रामचंद्र देखणे यांनी लोककलेचा गोंधळ घालत मूल्यांचा जोगवा मागितला, असे गौरवोद्गार महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष, प्रसिद्ध वक्ते प्रा. मिलिंद जोशी यांनी काढले. वडिलांकडून मिळालेला लोककलेचा समृद्ध आणि संपन्न वारसा डॉ. भावार्थ देखणे समर्थपणे पुढे नेत आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

डॉ. रामचंद्र देखणे यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त डॉ. रामचंद्र देखणे साहित्य कला प्रतिष्ठानतर्फे ‌‘बहुरूपी भारूड' या कार्यक्रमाचा नवीन 30 कलाकारांच्या संचात आज (दि. 14) पुन:प्रारंभ तसेच ‌‘लोककलेतील गण' या डॉ. देखणे लिखित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. त्या वेळी प्रा. जोशी बोलत होते. मॉडर्न इंजिनिअरिंग कॉलेजचे ऑडिटोरिअम येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

पुस्तकाचे प्रकाशन अखिल भारतीय त्रिपदी परिवाराचे अध्यक्ष प. पू. डॉ. बाबा महाराज तराणेकर (इंदोर) यांच्या हस्ते झाले. खासदार श्रीनिवास पाटील अध्यक्षस्थानी होते. पहिल्या विश्वात्मक संत साहित्याचे अध्यक्ष, केंद्र सरकारच्या कंपनी विधी न्यायाधीकरणाचे न्यायिक अधिकारी डॉ. मदन महाराज गोसावी, डॉ. भावार्थ देखणे, प्रमोद महाराज जगताप, ज्येष्ठ निरुपणकार उल्हास पवार, डॉ. पूजा देखणे, विश्वकर्मा पब्लिकेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सोनी, संदीप तापकीर आदी व्यासपीठावर होते.

प्रा. जोशी पुढे म्हणाले, ल. रा. पांगारकर, सोनोपंत दांडेकर आणि डॉ. रा. चिं. ढेरे यांच्या समृद्ध विचारांची पालखी डॉ. रामचंद्र देखणे यांनी दिमाखात मिरवत मौलिक काम केले. लेखणी आणि वाणी ही शब्दशक्तीची दोन्ही रूपे त्यांच्यावर प्रसन्न होती. संतांचे विचार त्यांनी केवळ सांगितले नाहीत तर त्या विचारांशी सुसंगत असे त्यांचे सात्विक जगणे होते. संत विचारांशी जन्मभर प्रामाणिक राहून सत्वशील जगण्याचा आदर्श वस्तुपाठ त्यांनी निर्माण केला. भारूडाचे निरूपण, रूपकांचे सादरीकरण आणि लोकभूमिका व त्यांचे स्वरूप याचे विव्ोचन करीत नृत्य, नाट्य, संवाद, संगीत यासह पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि कसलेल्या कलाकारांच्या सहकार्याने बहुरूपी भारूडांचा कार्यक्रम सादर करून डॉ. देखणे यांनी लोप पावत चाललेल्या भारूड या लोककलेचे पुनरुज्जीवन करून तिला प्रतिष्ठा मिळवून दिली.

जे रूढ नाही ते भारूड अशी उक्ती सांगून अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना श्रीनिवास पाटील म्हणाले, आता जे करायचे आहे ते बहुरूपी भारूड. या वेळी बोलताना त्यांनी डॉ. रामचंद्र देखणे यांच्या सोबतच्या ऋणानुबंधाचे धागे उलगडले.

डॉ. बाबा महाराज तराणेकर म्हणाले, डॉ. रामचंद्र देखणे यांच्याबरोबर एक अनोखा अनुबंध निर्माण झाला होता. त्यांच्या संस्कारांची वेल अशीच पुढे फुलत राहावी आणि त्यांचा लोककलेचा वारसा सातासमुद्रापार पोहोचावा.

ह. भ. प. मदन महराज गोसावी यांनी डॉ. रामचंद्र देखणे यांच्या आठवणींना उजाळा देत कीर्तन क्षेत्रात माझ्या सारख्या अनाथाचे डॉ. देखणे हे नाथ झाले, असे गौरवोद्गार काढले. प्रमोद महाराज जगताप, विशाल सोनी यांनी मनोगत व्यक्त केले.

 

बहुरूपी भारूडाचे गारूड

डॉ. भावार्थ देखणे यांच्यासह डॉ. पूजा देखणे, अवधूत गांधी, अभय नलगे, हृषीकेश कानडे, ओंकार दासनाम, संतोष उभे व सहकाऱ्यांनी ‌‘बहुरूपी भारूड' सादर केले. पारंपरिक दिंडीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. वासुदेव, जोशी, कडकलक्ष्मी, वेडी अन्‌‍ विंचू सादर झाल्यानंतर गोंधळ सादर करण्यात आला. लौकिक जीवन जगताना परमार्थाची प्राप्ती होण्यासाठी शिकवण देणारा, हाताला दानाची सवय लावणारा वासुदेव तर सामाजिक उणिवा दर्शविणारा जोशी, समाजातील अनिष्ट गोष्टींवर आसूड ओढणारी कडकलक्ष्मी तर समाजभान जागविणारी वेडी आणि विंचू तसेच देवाचा गोंधळ याद्वारे अभिजात लोककला, लोकसंगीत, उच्चविद्याविभूषीत युवा पिढी पुढे नेताना पाहून या बहुरूपी गारूडाने उपस्थितांच्या मनावर गारूड केले. पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून सादर करण्यात आलेली तालकचेरी आणि अखेरीस भैरव आणि पसायदान सादर करण्यात आले. देखणे परिवारातील चौथ्या पिढीतील शिलेदार गोरज देखणे (वय 8) याने पठ्ठे बापूराव यांचा गण ताकदीने सादर करत प्रेकक्षांची मने जिंकली.

समाजप्रबोधनाचे महत्त्वाचे अंग असलेल्या भारूड या कलेचे पुनरुज्जीवन व्हावे, डॉ. रामचंद्र देखणे यांच्या स्मृती त्यांनी उभारलेल्या कार्यातून पुढे न्याव्यात, पारंपरिक पद्धतीने चालत आलेल्या लोककलांची परंपरा जतन करत त्या प्रवाहित ठेवाव्यात हा कार्यक्रमाचा मूळ उद्देश असल्याचे डॉ. भावार्थ देखणे यांनी प्रास्ताविकात नमूद केले. ‌‘लोककलेतील गण' या पुस्तकाच्या प्रकाशनामागील भूमिका डॉ. पूजा देखणे यांनी विशद केली. मान्यवरांचा सत्कार मकरंद टिल्लू, अवधूत गांधी, संयज बालवडकर, नाथाभाऊ शेवाळे, धनंजय जोशी, काकासाहेब चव्हाण, ज्ञानेश्वर तापकीर, वि. दा. पिंगळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वि. दा. पिंगळे, विजय बोथरे पाटील यांनी केले.