जेष्ठ महिलेचा खून करून दागिने चोरले; हिंगणे खुर्द परिसरातील घटना

जेष्ठ महिलेचा खून करून दागिने चोरले; हिंगणे खुर्द परिसरातील घटना

पुणे – 

शहरातील हिंगणे खुर्द परिसरात एका 70 वर्षीय महिलेचा खून केल्याची धक्कादायक घटना शनिवारी घडली. त्यानंतर चोरट्यांनी महिलेच्या घरातून पावणेदोन लाख रूपयांचे दागिने चोरून नेले आहेत. शालिनी बबन सोनावणे (70, रा. हिंगणे खुर्द ) असे खून केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शालिनी सोनावणे हिंगणे खुर्दमधील एका सोसायटीत एकट्याच राहायला होत्या. त्यांचा मुलगा विराट सोनवणे हा शेजारील सोसायटी राहायला आहे. शनिवारी रात्री सव्वा नउच्या सुमारास शालिनी यांचा मुलगा त्यांच्याकडे गेला होता. त्यावेळी त्या हॉलमध्ये निपचीत पडल्याचे दिसून आले. त्यामुळे फिर्यादी मुलाने तत्काळ पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती दिली. त्यानुसार सिंहगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेउन पाहणी केली.

शालिनी यांना तीन मुले आहेत. त्यांचा एक मुलगा अविवाहित होता, त्याचा काही वर्षापुर्वी मृत्यू झाल्याने त्याच्या सदनिकेत त्या एकट्याच रहात होत्या. त्यांचे पती ग्रामविकास अधिकारी होते. त्यांच्या निधनानंतर मिळत असलेल्या पेन्शनवर त्या घरखर्च चालवत होत्या. तर दोन्ही मुले त्यांच्यापासून वेगळी रहातात. फिर्याद दिलेला मुलगा तीन महिण्यापुर्वीच त्यांच्या घराजवळ रहायला आला होता.

हा मुलगा व त्याची मुलगी दिवसातून दोन ते तीन वेळा शालिनी यांना घरी जाऊन भेटत होते. घटनेच्या दिवशीही मुलगा दुपारी भेटून गेला होता. त्यानंतर त्यांची मुलगीही घरी गेली होती. मात्र तीला घराची कडी बाहेरुण लावलेली दिसली. तीने याची कल्पना फिर्यादी असलेल्या वडिलांना दिली. त्यांनी रात्री उशीरा घरी जाऊन पहाणी गेल्यावर ही घटना उघडकीस आली.