दिव्यांग बालकास माता-पित्याने सोडले

पिंपरी (प्रबोधन न्यूज) - एका तीन वर्षाच्या दिव्यांग विशेष बालकास त्याच्या आई वडिलांनी बाजरीच्या शेतात सोडून दिले. ही घटना शुक्रवारी (दि. 30) दुपारी चिखली येथे घडली.
पोलीस कर्मचारी सचिन राम भिसे यांनी याबाबत शुक्रवारी (दि. ३०) चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली येथील चिंचेचा मळा, धनगर बाबा मंदिरासमोर, किसन तुकाराम ताम्हणे यांच्या बाजरीच्या शेतांमध्ये एका तीन वर्षीय दिव्यांग विशेष बालकाला त्याच्या आई-वडिलांनी सोडून दिले. याबाबतची माहिती दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास पोलिसांना मिळाली. पोलिसांनी संबंधित बालकास उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. चिखली पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.