दिल्लीत राष्ट्रपती राजवट लावा; आपच्याच आमदाराची मागणी

दिल्लीत राष्ट्रपती राजवट लावा; आपच्याच आमदाराची मागणी

दिल्ली, (प्रबोधन न्यूज) - दिल्लीतील कोरोनाचे संकट वाढतच आहे. दररोज अनेक रुग्णांचे मृत्यू होत आहेत. मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी जागा शिल्लक नसल्याची स्थिती आहे. दिल्लीच्या या गंभीर स्थितीवर सत्ताधारी आम आदमी पक्षाच्या आमदाराकडूनच व्यथा व्यक्त केली आहे. उच्चन्यायालयाने दिल्लीत राष्ट्रपती राजवट लागू करावी,अन्यथा दिल्लीत रस्त्या-रस्त्यावर मृतदेहांचा खच पडलेला दिसेल, अशी मागणीच त्याने केली आहे. आपचे आमदार शोएब इक्बाल यांनी ही मागणी केली आहे.

कोरोना संकटामुळे दिल्लीतील सत्ताधारी आपमध्ये असंतोषाचा आवाज ऐकायला मिळत आहे. दिल्लीच्या मटियामहलचे आमदार शोएब इक्बाल यांनी गंभीर वक्तव्य केले आहे. हे वक्तव्य दिल्लीमध्ये सध्या कोरोना संकटामुळे गंभीर बनलेल्या परिस्थितीवर केले आहे. त्यांनी उच्च न्यायालयालाही विनंती केली आहे. दिल्लीत अव्यवस्था पसरत आहे, यामुळे इथे राष्ट्रपती राजवट लावावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

दिल्लीमध्ये कोरोना रुग्णांना ना औषध मिळत आहे, ना हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन. लोकांचे कोणीच ऐकत नाहीय. मला दु:ख होतेय की आम्ही कोणाचीच मदद करू शकत नाही आहोत. मी सहा वेळा आमदार राहिलो आहे. मात्र, कोणीच ऐकत नाहीय. दिल्लीतील परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी उच्च न्यायालयाने दिल्लीत राष्ट्रपती राजवट लावावी, नाहीतर इथे रस्त्यांवर मृतदेह पडलेले दिसतील, असे त्यांनी म्हटले.