जगभर कोरोनाचा हाहाकार सुरु असताना 'या' देशातील लोक फिरत आहेत मास्कविना !

जगभर कोरोनाचा हाहाकार सुरु असताना 'या' देशातील लोक फिरत आहेत मास्कविना !

नवी दिल्ली, (प्रबोधन न्यूज) -  अवघ्या जगाला ग्रासलेल्या कोरोनाने भारतातही दुसऱ्या लाटेच्या रूपात धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. सध्या भारतात कोरोनाचा संसर्ग टिपेला पोहोचला असून दररोज रुग्णसंख्येचे आणि मृत्यूंचे नवनवे उच्चांक स्थापित होत आहेत. जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाचा कहर सुरु असला तरी एका देशाने मात्र या यमदूताला रोखण्यात यश मिळवला आहे. होय, इस्राएल या देशाने कोरोनाच्या जीवघेण्या लाटेला परतवून लावण्यात यश मिळविले आहे. कसे, ते पाहू. 

प्रगत तंत्रज्ञानासाठी जगभरात ओळखल्या जाणाऱ्या इस्रायलने कोरोनाचा पूर्णपणे पराभव केला आहे. सध्याच्या घडीला इस्रायलमध्ये कोणतेही निर्बंध नसून लोकांना मास्कविना फिरण्याचीही परवानगी देण्यात आली आहे. फक्त एखाद्या खोलीत किंवा बंदिस्त जागेत जास्त गर्दी असल्यास तोंडावर मास्क लावण्याची सक्ती आहे. तसेच देशातील सर्व शिक्षणसंस्थाही सुरु करण्यात आल्या आहेत. अगदी प्राथमिक शाळाही सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सध्याच्या घडीला इस्रायलमधील तब्बल 60 टक्के लोकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. त्यामुळे भविष्यात इस्रायलमध्ये कोरोनामुळे फार मोठा प्रभाव पडणार नसल्याचा दावा केला जात आहे.

असं काय केलं इस्त्राएलने ? 
इस्रायलने अत्यंत वेगाने लसीकरण करून तब्बल 60 टक्के लोकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस दिले आहेत. आतापर्यंत इस्रायलमधील 93 लाख लोकांना फायझरची लस टोचण्यात आली आहे. ही लस 90 टक्के प्रभावी असल्याचे सांगितले जाते.

गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात इस्रायलमध्ये लसीकरणाला सुरुवात झाली. त्यानंतर देशातील कोरोनाच्या मृत्यूदरात घट झाली. त्यामुळे आता इस्रायलमधील दैनंदिन व्यवहार पुन्हा सुरु केले जात आहेत. मे महिन्यापासून इस्रायलमध्ये परदेशी नागरिकांनाही प्रवेश देण्यात येईल. जगात कोरोनाची साथ आल्यापासून इस्रायलमध्ये आतापर्यंत 8.36 लाख नागरिकांना कोरोनाची बाधा झाली आहे. देशातील एकूण 6,331 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.