पुण्यात 'डॉक्टर मिळतील का हो डॉक्टर'?

पुण्यात 'डॉक्टर मिळतील का हो डॉक्टर'?

पुणे, (प्रबोधन न्यूज) - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुण्यातील आरोग्ययंत्रणा खिळखिळी झाली असून जवळपास कोलमडण्याच्या बेतात आहे,हे आता उघड झाले आहे. पुणे जिल्हा परिषदेने डॉक्टरांच्या पद भरतीसाठी जाहिरात दिली असून त्यात लाखो रुपयांचे पॅकेज देण्याची तयारी दाखवूनही डॉक्टर्स मिळत नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता पुण्यात आरोग्य सुविधांपाठोपाठ डॉक्टर्सचाही तुटवडा निर्माण झाल्याची चर्चा आहे. 

पुणे जिल्हा परिषदेला एमडी फिजीशीयन आणि एमबीबीएस डॉक्टर्सची भरती करायची आहे. या दोन्ही पदांसाठी अनुक्रमे 30 आणि 100 इतक्या जागा भरायच्या आहेत. आता या दोन्ही पदांसाठी जिल्हा परिषद पगारही भक्कम देत आहे. एमडी फिजीशीयन या पदासाठी महिन्याला दीड लाख तर एमबीबीएस डॉक्टरांसाठी महिन्याला 90 हजार रुपये मोजण्याची तयारी जिल्हा परिषदेने दाखवली आहे. मात्र, इतके करुनही जिल्हा परिषदेला अद्याप डॉक्टर्स मिळालेले नाहीत.

गेल्या महिन्याभरापासून जिल्हा परिषद पात्र उमेदवारांच्या शोधात आहे. मात्र, डॉक्टर्सनी जिल्हा परिषदेच्या प्रस्तावात विशेष रस दाखवलेला नाही. त्यामुळे आता जिल्हा परिषदेने कर्नाटक आणि तेलंगणासह 11 राज्यांमधील वृत्तपत्रांमध्ये या पदांच्या भरतीसाठी जाहिराती दिल्या आहेत. त्यामुळे आता तरी जिल्हा परिषदेला पात्र डॉक्टर मिळतील का, हे पाहणे गरजेचे आहे.