कोरोनाची दुसरी लाट मुलांसाठी धोकादायक ! 'ही' लक्षणे दुर्लक्षित करू नका !

कोरोनाची दुसरी लाट मुलांसाठी धोकादायक ! 'ही' लक्षणे दुर्लक्षित करू नका !

मुंबई, (प्रबोधन न्यूज) - कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लहान मुलांना आणि तरुणांना संसर्ग होण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढल्याचे दिसून येत असल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. कोरोना व्हायरसचा नवीन स्ट्रेन, रुग्णसंख्या कमी झाल्याने मुलांनी खेळायला घराबाहेर पडणं, घरातल्या मोठ्यांची सुरू झालेली ऑफिसेस आणि त्यानिमित्ताने होणारा प्रवास या कारणांमुळे लहान मुलं वेगाने बाधित होत असल्याचा तज्ज्ञांचा अंदाज आहे. तुमच्या मुलांना कोरोनापासून वाचवायचे असेल तर पुढील लक्षणे आढळल्यास अजिबात दुर्लक्ष करू नका. 

* लहान मुलांमध्ये कोरोना व्हायरसची पुढील लक्षणं आढळतात. 
- पोट बिघडणं
- उलट्या होणं
- डोकेदुखी
- बेशुद्ध पडणं
- सतत चिडचिड करणं, त्रागा करणं (अगदी लहान मुलांमध्ये)
- अंगावर पुरळ येणं
- डोळे लाल होणं
- हाताच्या वा पायाच्या नखांना किंवा बोटांना निळसर झाक येणं
- ताप
- कोरडा खोकला, घसा खवखवणं
- धाप लागणं
- तोंडाची चव जाणं, वास येणं बंद होणं

* कोरोनाची दुसरी लाट मुलांसाठी धोकादायक !
कोरोनाची नव्याने आलेली लाट ही नव्या स्ट्रेनमुळे आल्याचे दावे केले जातायत. कारण या नव्या कोरोनामध्ये जुन्या कोरोनाच्या लक्षणांसोबतच काही नवीन लक्षणंसुद्धा दिसून येत आहेत. ताप, थकवा, अशक्तपणा, खोकला या जुन्या लक्षणांसोबतच अतिसार किंवा जुलाब, उलट्यासद्धा या नव्या कोरोनाची नवी लक्षणं आहेत. हीच लक्षणं लहान मुलांसाठी घातक ठरतायत. यापूर्वीही लहान मुलांना कोरोनाची लागण होत होती, मात्र लहान मुलांमध्ये अँटीबॉडीज तयार करण्याची क्षमता मोठ्यांपेक्षा असल्यामुळे ती लवकर बरी व्हायची. मात्र नव्या कोरोनाची जुलाब, उलट्या अशा प्रकारची लक्षणं ही लहान मुलासांठी धोकादायक असू शकतात असं आरोग्य तज्ज्ञांचं मत आहे.

कोरोनातून बरं झाल्यानंतरही लहान मुलांना धोका?
कोरोनातून पूर्णपणे बरं झाल्यानंतरही लहान मुलांना त्रास जाणवत असल्याचेही डॉक्टरांच्या निदर्शनास आले आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी अनेक मुलांमध्ये प्रमाणापेक्षा जास्त रोगप्रतिकारक शक्ती निर्माण होते. त्यामुळे लहान मुलांमध्ये MIS – C अर्थात 'मल्टीसिस्टीम इन्फ्लमेटरी सिंड्रोम इन चिल्ड्रन' ही समस्या उद्धभवताना दिसत आहे. त्यामुळे शरीराच्या विशिष्ट भागात दुखणे, पोट बिघडणं, पोटात दुखणं, उलट्या, अंगावर पुरळ उमटणं, डोळे लाल होणं, ताप येणं, जीभ-घसा लाल होणे, असे परिणाम पाहायला मिळत आहेत. MIS – C वर तातडीने उपचार होणं गरजेचं असतं. हृदय, फुफ्फुसं, किडनी, मेंदू, डोळे, त्वचा, पोटातील आतडी या अवयवांवर याचा परिणाम होऊ शकतो. यासाठी मुलांमध्ये ही लक्षणं आढळल्यास त्यांना पूर्वी कोव्हिड होऊन गेला होता का, याविषयी डॉक्टरांना सांगणं आवश्यक आहे.