‘लिव्ह इन’ मध्ये राहणा-या महिलेने केली प्रियकराची हत्या , छत्रपती संभाजीनगरमधील धक्कादायक प्रकार

‘लिव्ह इन’ मध्ये राहणा-या महिलेने  केली प्रियकराची हत्या , छत्रपती संभाजीनगरमधील  धक्कादायक प्रकार

छ. संभाजीनगर , (प्रबोधन  न्यूज )  -  छत्रपती संभाजीनगर शहरात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, चार वर्षे ‘लिव्ह इन’ मध्ये राहणा-या महिलेने प्रियकराची हत्या केली आहे. ओळखीच्या लोकांच्या मदतीने या महिलेने प्रियकराला बेदम मारहाण केली होती. त्यानंतर त्याला शहरातील साई टेकडी परिसरात फेकून दिले होते. दुस-या दिवशी लोकांना मृतदेह आढळून आल्यावर या सर्व प्रकरणाचा उलगडा झाला आहे. आनंद साहेबराव वाहुळ (वय २७ वर्षे, उस्मानपुरा) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद हा रिक्षाचालक होता. त्याचे एका ४५ वर्षीय महिलेसोबत प्रेमसंबध होते आणि ते दोघेही चार वर्षांपासून ‘लिव्ह इन’ मध्ये राहत होते. सर्व काही सुरळीत सुरू असतानाच मागील काही दिवसांपासून दोघांमध्ये वाद सुरू झाला. त्यामुळे आनंद हा मुंबईला निघून गेला होता. मात्र, मागील आठवड्यात तो पुन्हा शहरात आला आणि येताच महिलेला भेटण्यासाठी तिच्या चिकलठाणा परिसरातील घरी गेला. त्यावेळी माझा नाद सोड, माझा मुलगा मोठा झाला आहे, त्याला ही बाब कळेल, वाद वाढतील, अशी विनंती महिलेने केली. मात्र, तरी आनंद ऐकत नव्हता.

शेवटी महिला, तिचा मुलगा व अन्य तीन आरोपींनी १३ डिसेंबर रोजी आनंदला बेदम मारहाण केली. गंभीर अवस्थेत त्याला दुचाकीवर नेऊन साई टेकडी परिसरात फेकून दिले. दरम्यान, बेदम मारहाणीमुळे आनंदचा मृत्यू झाला. त्या घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रवींद्र खांडेकर, उपनिरीक्षक योगेश खटाणे यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटीतील शवागृहात पाठवून दिला.