सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई

बोगस कागदपत्रे, स्मार्ट सिटीतील घोटाळेबाजांची गय करणार नाही - आयुक्त
पिंपरी - बोगस कागदपत्रे देऊन महापालिकेची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून स्मार्ट सिटीतील कामांबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. दोन्ही प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषी आढळल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही. आवश्यक त्या ठिकाणी शासनाचे मार्गदर्शन घेतले जाणार असून दोषींवर कठोर कारवाई केली जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी आज (दि. 22)पत्रकारांशी बोलताना दिली.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य विभागाने मेडिकल व पॅरामेडिकल कर्मचारी पुरविण्याची निविदा प्रसिद्ध केली होती. या निविदा प्रक्रियेत सहभागी झालेल्या श्रीकृपा सर्व्हिसेस या कंपनीने कोणताही अनुभव नसताना चार रुग्णालयांना कर्मचारी पुरविल्याचा खोटा अनुभवाचा दाखला जोडल्याचा आरोप राष्ट्रवादीचे माजी महापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल यांनी गुरुवारी (दि.21) पत्रकार परिषद घेऊन केला होता. तसेच बुधवारी (दि.20) झालेल्या सर्वसाधारण सभेत स्मार्ट सिटीमध्ये 250 कोटी रुपयांच्या निविदा प्रसिद्ध करताना तांत्रिक मान्यता न घेतल्याने या कामांत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा सर्वपक्षीय नगरसेवकांनी आरोप केला होता.
त्यानंतर स्मार्ट सिटीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा आता राज्यस्तरावर पोहोचला असून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी त्याची दखल घेत थेट किरीट सोमय्या यांनाच कागदोपत्री पुरावे देत ईडीची कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यातच शिवसेनेने हा मुद्दा उचलून धरत शुक्रवारी (दि.22) आंदोलन केले. सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकांसह सर्वपक्षीय नगरसेवकांनी स्मार्ट सिटीचा उचलून धरलेला भ्रष्टाचार आणि बहल यांनी पुराव्यासह उघडकीस आणलेला कोट्यवधीचा भ्रष्टाचार हे दोन्ही मुद्दे सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचे ठरल्याने आयुक्त या दोन्ही प्रकरणावरून काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले होते.
या दोन्ही भ्रष्टाचाराच्या प्रकरणाबाबत आयुक्तांनी पत्रकारांशी संवाद साधताना भ्रष्टाचाऱ्यांची गय केली जाणार नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, स्मार्ट सिटीचे काम देताना तांत्रिक मान्यता न घेतल्याबाबत तसेच उपठेकेदार, रस्ते खोदाई नियमानुसार न झाल्याच्या नगरसेवक आणि राजकीय पक्षाकडून तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याशिवाय वैद्यकीय विभागाने मेडिकल व पॅरामेडिकल कर्मचारी पुरविण्याबाबत जी निविदा प्रसिद्ध केली होती ती निविदा मिळविण्यासाठी ठेकेदाराने बोगस कागदपत्रे सादर केल्याचीही तक्रार प्राप्त झाली आहे. या तक्रारी व आक्षेपांची सखोल चौकशी केली जाईल. गरज भासल्यास शासनाकडून योग्य ते मार्गदर्शन मागविण्यात येईल. चौकशीमध्ये कोणीही दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. कोणाचीही गय केली जाणार नसल्याचे आयुक्त पाटील यांनी स्पष्ट केले.
ठेकेदार, अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले
बोगस कागदपत्रे सादर करून महापालिकेची फसवणूक करणाऱ्या ठेकेदारासह या बोगसगिरीला हातभार लावून ठेकेदाराचे हित साधणाऱ्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणल्याचे आज पहावयास मिळाले. या निविदा प्रक्रियेतील एक प्रमुख अधिकारी महापालिकेकडेच फिरकला नाही. तर अशीच स्थिती स्मार्ट सिटीच्या कार्यालयातही पहावयास मिळाली.