शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्या घर व ऑफिसवर पोलिसांचा बंदोबस्त

पिंपरी, (प्रबोधन न्यूज) - शिवसेनेत बंडखोरी करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे हे दाखल झाले आहेत. शिंदे गटात गेल्याने खासदार बारणे यांच्या थेरगावातील निवासस्थान आणि संपर्क कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

शिवसेनेतील 39 आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. त्यामुळे आमदारांचा मोठा गट शिंदे यांच्यासोबत गेल्यानंतर आता खासदारही गेले आहेत. शिवसेनेच्या 12 खासदारांनी शिवसेना गटनेते विनायक राऊत यांच्याजागी राहुल शेवाळे यांची गटनेतेपदी नियुक्ती केली आहे. त्याबाबतचे पत्र लोकसभा अध्यक्षांना दिले आहेत. त्यामुळे हा 12 खासदारांचा शिवसेनेतला मोठा गट लोकसभेत होईल. त्यासंदर्भात दुपारी पत्रकार परिषद आहे. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित असणार आहेत. आमदारांनी वेगळ गट केला. पण, लोकसभेत राहुल शेवाळे यांची गटनेतेपदीच नियुक्ती केली. त्याला मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनीही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे बारणे शिंदे गटात दाखल झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

पिंपरी-चिंचवड, मावळ आणि पनवेल, उरण, खालापूर या भागाचा समावेश असलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे लोकसभेत प्रतिनिधीत्व करतात. खासदार बारणे हे सलग दोनवेळा मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत हे विशेष. आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा विचार करुन खासदार बारणे यांनी भाजपसोबत युती केलेल्या शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणे पसंत केल्याची चर्चा आहे. हा निर्णय घेऊन खासदार बारणे यांनी 2024 मध्ये पुन्हा दिल्लीत जाण्याचा मार्ग सुकर केल्याचे बोलले जात आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात खासदार बारणे यांची ताकद आहे. त्यांचे पुतणे शिवसेनेचे नगरसेवक राहिलेत. त्यांचे पुत्र विश्वजीत बारणे पिंपरी-चिंचवड शहर युवासेना प्रमुख आहेत. पिंपरीचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार, आकुर्डीतील माजी नगरसेवक प्रमोद कुटे, वाकड भागातील माजी नगरसेविका रेखा दर्शिले, महिला संघटिका उर्मिला काळभोर, माजी शहरप्रमुख योगेश बाबर हे खासदार बारणे यांचे समर्थक आहेत. त्यामुळे बारणे शिंदे गटात गेल्याने शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे.

याबाबत बोलताना खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की शिवसेना गटनेतेपदी राहुल शेवाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शेवाळे यांच्या नियुक्तीला मी पाठिंबा दिला आहे. संसदीय कामामध्ये राहुल शेवाळे यांची जास्त सहकार्याची भूमिका राहिली आहे. त्यामुळे मी त्यांना पाठिंबा दिला आहे. आम्ही सगळे शिवसेनेशी संलग्न आहोत.