वादग्रस्त ‘स्पर्श’वर खंडणीचा गुन्हा दाखल होणार

वादग्रस्त ‘स्पर्श’वर खंडणीचा गुन्हा दाखल होणार

मनुष्यबळ पुरवठ्याचे कामही दहा दिवसांत काढले जाणार; महापालिका आयुक्तांची घोषणा

पिंपरी (प्रबोधन न्यूज) - पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून चालविण्यात येणार्‍या ऑटो क्लस्टर येथील रुग्णालयात रुग्णाला बेड उपलब्ध करून देण्यासाठी एक लाख रुपये स्विकारल्याच्या प्रकरणाचे सर्वसाधारण सभेत प्रचंड पडसाद उमटले. या प्रकरणावरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी आयुक्तांना धारेवर धरल्यानंतर महापौर माई ढोरे यांनी स्पर्श या ठेकेदारावर कारवाईचे आदेश दिले. यानंतर महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी स्पर्शच्या संचालकांवर खंडणीचा गुन्हा दाखल केला जाईल तसेच पुढील दहा दिवसांत त्यांच्याकडील मनुष्यबळ पुरवठ्याचे कामही काढून घेतले जाईल, असे आश्वासन सर्वसाधारण सभेत दिले.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची विशेष सर्वसाधारण सभा आज (शुक्रवारी) पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर माई ढोरे होत्या. सभेच्या सुरुवातीलाच भाजपाचे नगरसेवक कुंदन गायकवाड आणि विकास डोळस या नगरसेवकांनी स्पर्शच्या सल्लागाराने महापालिकेच्या ऑटो क्लस्टर येथील कोविड सेंटरमध्ये रुग्णाला दाखल करून घेण्यासाठी एक लाख रुपये स्विकारल्याचा मुद्दा उपस्थित केला.

गायकवाड म्हणाले, महापालिका शाळेच्या मुख्याध्यापिकेवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना आयसीयूची आवश्यकता असल्याचे तेथील डॉक्टरांनी सांगत एक लाख रुपये द्या आम्ही बेड मिळवून देतो, असे सुचविले. एक लाख रुपये घेऊन त्यांना महापालिकेच्या ऑटो क्लस्टर येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करून घेण्यात आले. ही सुविधा मोफत असताना एक लाख रुपये घेतल्यामुळे हे कोविड सेंटरचे संचलन करणार्‍या स्पर्श हॉस्पिटलचे बिंग फुटले. स्पर्श हॉस्पिटलच्या सल्लागाराने 80 हजार रुपये तर खासगी हॉस्पिटलचालकाने 20 हजार रुपये घेतल्याचे पुरावेच गायकवाड यांनी सभागृहात सादर केले. तसेच ज्यावेळी हा प्रकार समोर आला त्याच क्षणी आणखी सहा रुग्णांच्या नातेवाईकांकडून पैसे घेतल्याचे गायकवाड म्हणाले.

यानंतर सुजाता पालांडे, अभिषेक बारणे, शशिकांत कांबळे, आशा शेंडगे, सीमा सावळे वैशाली घोडेकर, तुषार हिंगे, सागर आंगोळकर, अजित गव्हाणे, एकनाथ पवार, राहूल कलाटे, सचिन चिखले यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवकांनी या प्रकारावरून प्रशासनाला धारेवर धरले तसेच आपण काय कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित केला.

तर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक योगेश बहल यांनी स्पर्शने यापूर्वी केलेल्या सव्वा तीन कोटींच्या भ्रष्टाचारात या ठेकेदाराला पाठीशी का घातले जात आहे? असा प्रश्न उपस्थित केला. बोगस डॉक्टर, सुपर स्पेशालिटी कन्स्लटंट म्हणून प्रतीमहा घेतले जात असलेले लाखो रुपये यासह अनेक मुद्यावर ‘स्पर्श’चा भांडाफोड केला. याच रुग्णालयातून बेकायदा महापालिकेच्या रेमडेसिवीर विकल्या जात असल्याचाही आरोप बहल यांनी केला. मयतांच्या टाळूवरील लोणी खाणारे ‘पाप’ कोठे फेडणार असा प्रश्न विचारात जोपर्यंत स्पर्शवर कारवाई होणार नाही तोपर्यंत आपण खाली बसणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली.

महापौर माई ढोरे यांनी स्पर्शवर कारवाई होईल, असे सांगितल्यानंतर बहल खाली बसले. यानंतर पक्षनेते नामदेव ढाके यांनी स्पर्शने स्विकारलेल्या पैशांचा मुद्दा उपस्थित करत कारवाईची मागणी केली. पक्षनेत्यांच्या भाषणानंतर महापौरांनी आयुक्तांना खुलासा करण्याचे तसेच स्पर्शवर कारवाई करण्याचे आदेश दिले. या आदेशानंतर आयुक्तांनी स्पर्शच्या संचालकांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्याबरोबरच येत्या दहा दिवसांत त्यांच्याकडील ठेकेदारी काढून घेतली जाईल, अशी घोषणा केली.

योगेश बहल यांचे पक्षनेत्यांवर गंभीर आरोप

ऑटो क्लस्टर येथे रुग्णाला दाखल करण्यासाठी एक लाख रुपये स्विकारल्याच्या प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी भाजपाचे पक्षनेते नामदेव ढाके यांच्यासह भाजपाचेच दोन ते तीन नगरसेवक मध्यस्थी करत असल्याचा आरोप योगेश बहल यांनी सर्वसाधारण सभेत केला. मध्यस्थी करणार्‍यांनी हे प्रकरण मिटविण्यासाठी पंधरा ते वीस लाख रुपये देण्याची तयारी दाखविली होती. सर्वांना फोन केले जात होते, हा अत्यंत किळसवाना प्रकार घडला. हा प्रकार ऐकूण आणि भाजपाचेच पक्षनेते हे प्रकरण मिटविण्यासाठी पुढाकार घेत असल्याचे धक्का बसल्याचेही बहल म्हणाले.

ऑटो क्लस्टर, जम्बो

पालिकेतील डॉक्टरांच्या ताब्यात द्या

ऑटो क्लस्टरमध्ये रुग्णांना दाखल करून घेण्यासाठी पैसे स्विकारले जात असून जंम्बोमध्ये मनमानी सुरू असल्याचा आरोप अनेक नगरसेवकांनी केला. ही दोन्ही रुग्णालये चालविण्यासाठी महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयात काम करत असलेले अनेक डॉक्टर सक्षम असून गेल्या वर्षभरापासून त्यांनी कोविडच्या काळात केलेले काम उल्लेखनिय आहे. अनेकांचे प्राण वाचविण्यासाठी हे डॉक्टर आपला जीव धोक्यात घालून काम करीत आहेत. त्यामुळे ही दोन्ही रुग्णालये महापालिकेत कार्यरत असलेल्या डॉक्टरांच्या ताब्यात देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

रुबी’अलकेअरचे कौतुक

महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातील रुबी अलकेअरकडे दोन आयसीयू आणि पहिल्या मजल्यावरील संपूर्ण 34 बेडचे मॅनेजमेंट आहे. या ठिकाणी रुग्णांवर अत्यंत आश्वासक उपचार सुरू असून त्या ठिकाणचा सर्वांत कमी मृत्यूदर असल्याचे म्हणणे भाजपा व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी मांडले. वायसीएमसह रुबीमध्ये योग्य उपचार दिले जातात, रुग्ण बरे होतात त्या ठिकाणच्या रुग्णांना चांगल्या सुविधा दिल्या जात असून तज्ञ डॉक्टर चांगल्या पद्धतीने उपचार करत असल्याचे कौतुकही काहीजणांनी यावेळी केले.

गायकवाड, डोळस यांचेही कौतुक

महापालिकेच्या कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यासाठी मुख्याध्यापिकेच्या नातेवाईकांकडून एक लाख रुपये घेतल्याचा प्रकार उघडकीस आणणार्‍या नगरसेक कुंदन गायकवाड व विकास डोळस यांचे कौतुक सर्वपक्षीय नगरसेवकांनी केले. स्वपक्षीयांकडूनच निर्माण झालेला राजकीय दबाव तसेच आर्थिक अमिष दाखविल्यानंतरही या दोघांनी घेतलेली भूमिका निश्चितच कौतुकास्पद असल्याचे अनेक नगरसेवकांनी बोलून दाखविले.