महाराष्ट्रात बुधवारपासून पुन्हा लॉकडाऊन

महाराष्ट्रात गेल्या दीड महिन्याभरात सातत्याने वाढत असलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंधरा दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे.

महाराष्ट्रात बुधवारपासून पुन्हा लॉकडाऊन

ब्रेक द चेन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

पिंपरी, (प्रबोधन न्यूज) - महाराष्ट्रात गेल्या दीड महिन्याभरात सातत्याने वाढत असलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंधरा दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला आहे. महाराष्ट्रात रुग्णसंख्येसोबतच मृतांचा आकडा देखील वाढू लागला आहे. त्यासोबतच राज्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर या आरोग्य सुविधांची कमतरता देखील जाणवू लागल्यानंतर शेवटचा पर्याय म्हणून आपण लॉकडाऊनची घोषणा करत असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी लॉकडाऊन करायला हवा, असा देखील दावा देखील त्यांनी केला आहे. लॉकडाऊनबाबत संमिश्र प्रतिक्रीया उमटल्या आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुकद्वारे राज्यातील तमाम जनतेशी संवाद साधला. ते यावेळी बोलताना म्हणाले, नाईलाजाने आपल्याला काही निर्बंध घालावे लागणार आहेत. चर्चेत आपण बराच वेळ घालवला आहे. आता निर्णय घेण्याचा क्षण आला आहे. आपल्याला रोजीरोटी महत्त्वाची आहेच. पण त्याआधी जीव वाचवणं आवश्यक आहे. सध्या तोच आपल्यासमोरचा महत्त्वाचा मुद्दा आहे. उद्या (बुधवार दि. १४)  संध्याकाळी ८ वाजल्यापासून हे निर्बंध लागू होतील. पंढरपूर मंगळवेढ्याचं मतदान आहे. ते झाल्यानंतर तिथे देखील निर्बंध लागू होतील. उद्या संध्याकाळपासून आपण ब्रेक द चेनं लागू करत आहोत. राज्यात १४४ कलम लागू होणार. याचा अर्थ पुढचे किमान १५ दिवस राज्यात संचारबंदी लागू असेल. अनावश्यक प्रवास पूर्णपणे बंद करावा लागणार आहे. अत्यावश्यक कारणाशिवाय घरातून बाहेर पडण्यास बंदी करण्यात आली आहे..

जिवनावश्यक सेवा सुरू राहणार

अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा पुढील पंधरा दिवस बंद राहणार आहेत. सकाळी ७ ते रात्री ८ या काळात अत्यावश्यक सेवाच चालू राहतील. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आपण बंद करत नाही आहोत. लोकल, बस सुरू राहतील. पण त्या अत्यावश्यक, जीवनावश्यक सेवा देणाऱ्या वर्गाला येण्या-जाण्यासाठी त्या चालू राहतील, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी जाहीर केले. पावसाळ्याची कामं पावसाळ्यापूर्वच करावी लागतात. ती कामं चालू राहतील. बँका सुरू राहतील. दूरसंचार सेवा आणि त्यांच्याशी संबंधित देखभाल सेवा सुरू राहतील. अधिसूचनाधारक पत्रकारांना मुभा देण्यात आली आहे. पेट्रोल सेवांना मुभा देण्यात आली आहे. बांधकाम साईट्सवर मजुरांची राहण्याची सोय करावी अशी बांधकाम व्यावसायिकांना विनंती आहे. हॉटेल, रेस्टॉरंट यांच्यामधून होम डिलीव्हरी आणि टेक अवे यालाच परवानगी असेल. तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं लसीकरण बंधनकारक असेल.