आता ऑटो क्लस्टरमध्ये रुग्णांना 'व्हाया' वायसीएमच दाखल करता येणार !

आता ऑटो क्लस्टरमध्ये रुग्णांना 'व्हाया' वायसीएमच दाखल करता येणार !

पिंपरी, (प्रबोधन न्यूज) - ऑटो क्लस्टर येथे रुग्णाला बेड मिळवून देण्यासाठी एक लाख रुपये स्विकारल्याचा प्रकार समोर आल्यानंतर आता ऑटो क्लस्टरमध्ये थेट रुग्ण दाखल करून घेण्यास बंदी करण्यात आली आहे. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातून संदर्भित (रेफर) केलेल्या रुग्णालाच आता ऑटो क्लस्टर येथे दाखल केले जाणार आहे. त्याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त राजेश पाटील यांनी रविवारी (दि.2) काढले आहेत.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने ऑटो क्लस्टर येथे कोविड समर्पित रुग्णालय चालविण्यात येत आहे. या रुग्णालयासाठी मेडिकल आणि पॅरामेडिकल कर्मचारी पुरविण्याचे काम स्पर्श हॉस्पीटल यांना देण्यात आले आहे. या ठेकेदाराकडे काम करणार्‍या डॉक्टरांनी रुग्णाला दाखल करून घेण्यासाठी एक लाख रुपये स्विकारल्याचे प्रकरण सध्या गाजत आहे. यावरून महापालिकेच्या सर्वसाधारण सभेतही गोंधळ झाला होता. या प्रकरणाची दखल घेत रुग्णांना दाखल करून घेण्याबाबत सुसूत्रता आणण्याच्या हेतूने तसेच चुकीचे प्रकार यापुढे घडू नयेत यासाठी महापालिका आयुक्तांनी आदेश जारी केले आहेत.

या आदेशात आयुक्तांनी म्हटले आहे की, ऑटो क्लस्टर येथे यापुढे एकही रुग्ण थेट दाखल करून घेण्यात येऊ नये. महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयातून जे रुग्ण संदर्भीत केले जातील, त्यांनाच ऑटो क्लस्टर येथे दाखल करून घेण्यात यावे. ऑटो क्लस्टर येथे रुग्ण संदर्भीत करण्यासाठी डॉ. हर्षल पांडवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पांडवे यांनी डॉ. राहूल गायकवाड व डॉ. गौरव वडगावकर यांच्याशी संपर्क साधून ऑटो क्लस्टर येथील रिक्त बेडची माहिती घेऊन रुग्ण संदर्भीत करावेत, असेही या आदेशात म्हटले आहे.