प्रेक्षकांना नॉनस्टॉप मनोरंजन देण्यासाठी 'स्टार प्रवाह'च्या मालिकांचे राज्याबाहेर  चित्रीकरण !

प्रेक्षकांना नॉनस्टॉप मनोरंजन देण्यासाठी 'स्टार प्रवाह'च्या मालिकांचे राज्याबाहेर  चित्रीकरण !

मुंबई, (प्रबोधन न्यूज) - महाराष्ट्रातील कोरोनासंसर्गाला रोखण्यासाठी राज्याची वाटचाल पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेने होत आहे. अशा वेळी प्रेक्षकांना नॉनस्टॉप मनोरंजन देण्यासाठी सर्व वाहिन्या वेगवेगळ्या उपाययोजनांमध्ये गर्क असतानाच 'स्टार प्रवाह' या मराठी मनोरंजन वाहिनीने धाडसी म्हणावा असा निर्णय घेतला आहे. या वाहिनीवरील दैनंदिन मालिकांचं शूट आता महाराष्ट्राबाहेर होणार आहे. 

स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका गेल्या अनेक आठवड्यांपासून टॉपवर आहेत. बहुतांश आठवडे स्टार प्रवाहवरील वाहिन्याच पहिल्या पाचामध्ये स्थान मिळवत आहेत. 'आई कुठे काय करते', 'रंग माझा वेगळा', 'स्वाभिमान' यासारख्या बहुतांश मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना मनोरंजनात कुठलाही व्यत्यय येऊ नये, याची काळजी स्टार प्रवाह वाहिनीकडून घेतली जाणार आहे.

‘आई कुठे काय करते!’, ‘स्वाभिमान’, ‘सहकुटुंब सहपरिवार’, ‘मुलगी झाली हो’, ‘सांग तू आहेस का?’ या पाचही मालिकांचं शूटिंग आता गुजरात बॉर्डरवरील सिल्वासामध्ये होणार आहे. ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेचं शूट अहमदाबादेत होणार आहे. तर ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ आणि ‘रंग माझा वेगळा’ या मालिकांची चित्रिकरणं गोव्याला हलवण्यात आली आहेत. त्यामुळे प्रेक्षकांना आता त्यांच्या लाडक्या व्यक्तिरेखांची नवी घरं आणि परिसर पाहायला मिळेल. त्या अनुषंगाने कथानकातही काही बदल होणार का, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात मनोरंजन विश्वाला मोठा फटका बसला होता. मालिकांचं चित्रिकरण मार्च ते जुलै असे जवळपास चार महिने बंद होतं. त्यामुळे प्रेक्षकांना जुन्या भागांचा आस्वाद घ्यावा लागत होता. याचा पुन्हा फटका बसू नये, यासाठी दरम्यानच्या काळातच अनेक निर्मात्यांनी एपिसोड्सची बँक तयार करुन ठेवली होती. सध्या महाराष्ट्रातील चित्रिकरण थांबताच बहुतांश हिंदी मालिकांनी राज्याबाहेर शुटिंग सुरु केलं आहे. मराठी मालिकांसाठी हा पर्याय खर्चिक असला, तरी अखंड मनोरंजनाची हमी देण्यासाठी अनेक वाहिन्यांनी पोटाला चिमटा काढत तो स्वीकारला आहे.