ड्रोनमधून कोविड लसीची होणार डिलिव्हरी

ड्रोनमधून कोविड लसीची होणार डिलिव्हरी

नवी दिल्ली, (प्रबोधन न्यूज) - देशात कोरोना संसर्गाच्या दुसºया लाटेनंतर भयावह स्थिती निर्माण झाली आहे. कोरोनाचा धोका कायमचा टाळण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची आवश्यकता महत्त्वाची ठरत असल्याने सर्वत्र लसीकरणावर भर दिला जात आहे. मात्र सध्या अनेक राज्यांनी लसीच्या तुटवड्याची तक्रार केली असून लसीकरण मोहिमेला ब्रेक मिळण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभमीवर जलद लस पुरवठ्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात येणार आहे. तेलंगण राज्यात हा उपक्रम सर्वप्रथम राबविण्यात येत असून केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाने त्याला मंजूरी दिली आहे.

कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी केंद्र सरकार सर्वच प्रकारच्या तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे. लसीकरण मोहिमेत कोविड लस जागोजागी पोहोचविण्याकरिता तत्सम तंत्र वापरणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे उड्डयन मंत्रालयाने ड्रोनद्वारे कोरोना लसीच्या डिलिव्हरीला मान्यता दिली आहे.
लसीकरणाला गती देण्यासाठी या प्रयोगाचा फायदा होणार आहे. सध्या देशात १५ कोटींहून अधिक लोकांना कोविड १९ लसीचा डोस देण्यात आला. अनेक राज्यांतील रुग्णालये वैद्यकीय आॅक्सिजन आणि बेड्सच्या अभावामुळे अडचणीत असून, कोरोनाची दुसरी लाट भारतात हाहाकार माजवत आहे. त्यापार्श्वभुुमीवर केंद्र सरकारकडून हवाई मार्गे विमानाद्वारे आॅक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे. मात्र मानवरहित ड्रोनद्वारे लसीचा पुरवठ्याचा प्रयोग यशस्वी झाल्यास सर्वच प्रकारच्या गरजांचा पुरवठा केला जाईल, असे सांगण्यात येत आहे.

प्रायोगिक तत्वावर मान्यता
नागरी उड्डयन मंत्रालयाने शुक्रवारी तेलंगणा सरकारला कोविड लसीच्या डिलिव्हरीसाठी प्रायोगिक तत्त्वावर ड्रोनचा वापर करण्यास परवानगी दिली आहे. परंतु कोणत्या प्रकारची विशिष्ट लस पोहोचवण्यात येईल याबाबत मंत्रालयाच्या निवेदनात माहिती दिलेली नाही. तेलंगणा सरकारला मानवरहित विमान प्रणाली नियम, २०२१ मधून सशर्त सूट देण्यात आली आहे. विमानाच्या दृष्टिकोनातून ड्रोनचा वापर करून प्रायोगिक तत्त्वावर लसी पोहोचवणे फायदेशीर आहे, असेही मंत्रालयाने म्हटले आहे.

एक वर्षासाठी दिली मुभा
तेलंगणा सरकारला या प्रकल्पास एक वर्षाच्या कालावधीसाठी किंवा पुढील आदेश येईपर्यंत मान्यता दिलेली आहे. २२ एप्रिल रोजी मंत्रालयाने भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेला (आयसीएमआर) कोविड १९ लस देण्यासाठी ड्रोन वापरण्याबाबत व्यवहार्यता तपासण्याची परवानगी दिली आहे.