चढ्या दरामुळे आंबा खरेदीकडे ग्राहकांची पाठ

मागणी नसल्याने उत्पादकांसह व्यापारीही अडचणीत

चढ्या दरामुळे आंबा खरेदीकडे ग्राहकांची पाठ

पुणे, (प्रबोधन न्यूज) गुढीपाडव्याच्या निमित्ताने श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील फळबाजारात आंब्यांची मोठी आवक होते. यंदाच्या वर्षी पाडव्याला आंब्यांचे दर चढे राहिल्याने अपेक्षित मागणी नोंदविली गेली नाही. ग्राहकांनी आंबा खरेदीकडे पाठ फिरविल्याने उत्पादकांसह व्यापारीही अडचणीत आल्याचे चित्र मंगळवारी बाजारात पहावयास मिळाले.

दरवर्षी पाडव्याला आंब्याला चांगली मागणी असते. मात्र, करोनाचा संसर्ग वाढत असल्याने आंब्यांची आवक तशी कमी झाली आहे. दरवर्षी पाडव्याला आंब्याच्या साडेचार ते पाच हजार पेटय़ांची आवक बाजारात होते. यंदा आंब्यांची आवक कमी झाली आहे. रत्नागिरीहून तीन हजार आंब्यांच्या पेटय़ा मार्केट यार्डातील फळबाजारात विक्रीसाठी दाखल झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

आंबा महाग असल्याने किरकोळ खरेदीदारांनी पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळाले. करोनाच्या संसर्गामुळे आंबा विक्रीवर काहीसा परिणाम झाला आहे. संसर्ग नसता तर आंबा खरेदी मोठय़ा प्रमाणावर झाली असती. ग्राहकांना घरपोच आंबे पोहोचवण्याची व्यवस्था व्यापाऱ्यांकडून करण्यात आली आहे. मागणीनुसार ग्राहकांना आंबा घरपोच देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याचेही व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.