ऑक्सिजन तुटवडा दूर करण्यासाठी शरद पवार मैदानात

ऑक्सिजन तुटवडा दूर  करण्यासाठी शरद पवार मैदानात

१९० साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मितीचे आदेश

पुणे. (प्रबोधन न्यूज) - पुणे मुंबईसह राज्यात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना दुसरीकडे मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. ऑक्सिजनच्या अभावी अनेक रुग्णांना आपला जीव गमवावा लागला असून, काही रुग्णांचा जीव टांगणीला लागला आहे. सरकारी यंत्रणांमार्फत ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी अहोरात्र प्रयत्न सुरु आहे. आता राज्यातील ऑक्सिजनच्या निर्माण झालेल्या संकटातून मार्ग काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार मैदानात उतरले आहेत. ऑक्सिजनची निर्मिती करण्याचे आदेश त्यांनी राज्यातील साखर कारखान्यांना दिले आहे.

राज्यातील ऑक्सिजनच्या तुटवड्यावर मात करण्यासाठी ज्येष्ठ नेते व वसंतदादा शुगर इन्स्टिटयूटचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पवार यांनी राज्यातील तब्बल १९० साखर कारखान्यांना ऑक्सिजन निर्मिती आणि पुरवठा करण्याचे आदेश दिले आहे. या संबंधी जलदगतीने कार्यवाही करताना वसंत शुगर इन्स्टिटयूच्या वतीने त्यांनी साखर कारखान्यांना हे पत्र पाठविण्यात आले आहे.

बंद कारखानेही उपयोगात आणणार
दरम्यान विशाखापट्टणम येथे ऑक्सिजन एक्सप्रेसदेखील रवाना झाली आहे. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी ऑक्सिजन प्लँट उभारणीसाठी सुद्धा पावले टाकली जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी राज्यातील सहकारी आणि खासगी अशा एकूण १९० कारखान्यांना ऑक्सिजन निर्मितीच्या सूचना केल्या आहेत. तसेच जे कारखाने बंद आहेत त्यांना ऑक्सिजन किट खरेदी करून रुग्णालयांना पुरवावे असेही आवाहन केले आहे. पवारांच्या सूचनेनुसार साखर कारखान्यांना पत्र पाठवण्यात आली आहेत. मागील वर्षी कोरोना प्रादुर्भाव वाढत असताना राज्यातील कारखान्यांनी सॅनिटायझर निर्मिती करत सामाजिक बांधिलकी जपली होती.