रशियात पुन्हा कोरोनाचा उद्रेक

रशियात पुन्हा कोरोनाचा उद्रेक


मॉस्को - रशियातील करोना रुग्ण आणि करोनामुळे झालेले मृत्यूू यांची उच्चांकी नोंद शुक्रवारी झाल्याने या देशाच्या आरोग्य यंत्रणेपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. त्याचप्रमाणे बीजिंगमध्येही या आठवड्यापासून करोना रुग्णांची नोंद झाली असून त्यामुळे चीनमध्ये दोन महिन्यांपासून असलेले शून्य रुग्णांची नोंद संपुष्टात आली आहे.

रशियात सरकारच्या करोना विषाणू कृती गटाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत करोनाचे ३७,१४१ नवे रुग्ण आणि १,०६४ मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यामुळे रशियातील एकूण करोना बळींची संख्या २,२८,४२३ झाली असून ती युरोपातील सध्याची सर्वाधिक आहे. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांनी या गंभीर स्थितीची दखल घेतली आहे. नागरिकांनी ३० ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर या कालावधीत कार्यालयांत जाऊ नये, असा आदेश त्यांनी दिला आहे. तेथे सुट्यांचा कालावधी आधीच वाढविण्यात आला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी निर्बंध कठोर करावेत, असेही सरकारने बजावले आहे.

दरम्यान, चीनच्या शून्य करोना धोरणाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एक सेवानिवृत्त चीनी दांपत्याची करोना चाचणी सकारात्मक आली असून त्यांनी नुकताच देशभर प्रवास केला होत. देशातील वाढत्या करोना प्रकरणासाठी त्यांना दोषी ठरवण्यात आले आहे. चीनमध्ये शुक्रवारी करोनाचे ३२ नवे रुग्ण आढळले. ज्यात बीजिंगमधील चौघांचा समावेश आहे. राजधानीमध्येच वाढ झाल्याने पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या हिवाळी ऑलिम्पिकवर करोनाचे सावट दिसून येत आहे. बीजिंगमध्ये या आठवड्यापासून करोना रुग्णांची नोंद झाली असून त्यामुळे दोन महिन्यांपासून असलेले शून्य रुग्णांची नोंद संपुष्टात आली आहे. सध्या बीजिंग, मंगोलिया, गांसु, शानक्सी, निंग्झिया, गुईझोऊ आणि किन्घाई या भागांत पुन्हा उद्रेक झाला आहे.